रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) :
रावेर तालुक्यातील कर्जोत येथे 33/11 केवी उपकेंद्राच्या कामाचा शुभारंभ दि. 20 एप्रिल 2026 (सोमवार) रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. सुमारे 1.94 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे परिसरातील वीजपुरवठ्याच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होणार आहे.
(ads)
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री मा. ना.रक्षाताई खडसे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा मंत्री मा.ना. गिरीशभाऊ महाजन, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा. ना.गुलाबरावजी पाटील, तसेच उद्योग मंत्री मा. ना. श्री. संजयजी सावकारे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे भूमिपूजन आमदार मा.अमोलभाऊ जावळे यांच्या हस्ते पार पडणार आहे.
(ads)
1 x 5 MVA क्षमतेच्या या उपकेंद्रामुळे सध्या 132/11 केवी रावेर उपकेंद्रावर असलेला लोड कमी करून विविध फीडर्सची विभागणी करण्यात येणार आहे. त्यामुळे वीजपुरवठा अधिक स्थिर, अखंड आणि दर्जेदार होणार आहे.
(ads)
अहिरवाडी शेती फीडर संदर्भात सध्या रावेर उपकेंद्रावरील भार कमी करून त्याचे दोन भाग करण्यात येणार आहेत. यात रावेर ग्रामीण व भोकरी शिवार भागाला सुधारित वीजपुरवठा मिळेल, तर नव्या कर्जोत उपकेंद्रातून वाघोड, कर्जोत व पाडळा शिवार येथे अधिक गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा उपलब्ध होईल.
(ads)
तसेच तामसवाडी गावठाण फीडरची देखील दोन भागांत विभागणी करण्यात येणार आहे. यामध्ये रासलपूर (काही भाग), भोकरी शिवार व शिंदखेडा गावांना रावेर उपकेंद्रातून सुधारित वीजपुरवठा मिळेल, तर कर्जोत उपकेंद्रातून वाघोड, अहिरवाडी, कर्जोत, मोहगण व तामसवाडी या गावांना अधिक स्थिर व गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा मिळणार आहे.
(ads)
या उपकेंद्रामुळे व्होल्टेजमधील चढ-उतार कमी होऊन शेतीपंपांना नियमित वीज उपलब्ध होणार आहे. परिणामी शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल तसेच ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे.







