डंपरच्या धडकेने नायब तहसीलदारांचा जागीच मृत्यू

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


पुण्यातील जुन्नर तालुक्यामध्ये प्रशासनात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. जुन्नर तालुक्यातील बनकरफाटा-जुन्नर मार्गावर गणपती फाट्याजवळील एस कॉर्नर परिसरात हायवा डंपर आणि होंडा सिटी कार यांची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडला.

या अपघातात जुन्नरचे निवडणूक नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी (वय 52) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

(ads)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महसूल विभागातील अधिकारी अनंता गवारी हे आपल्या होंडा सिटी कारने बनकरफाटा दिशेने जात होते. त्याच वेळी समोरून पांगरीमाथा बाजूकडून येणाऱ्या हायवा डंपरने एस कॉर्नर वळणावर कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आणि वाहन नियंत्रणाबाहेर जाऊन उलट दिशेला फेकले गेले.

(ads)

अपघातात अनंता गवारी हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यासोबत असलेले महसूल कर्मचारी विजय खारतोडे यांनाही गंभीर दुखापत झाली, तर तुषार कोरडे हे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने बाहेर काढून ओतूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याकडे हलवण्यात आले. दुर्दैवाने, रुग्णालयात नेत असतानाच नायब तहसीलदार अनंता गवारी यांची प्राणज्योत मालवली.

(ads)

घटनेनंतर परिसरात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. ओतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या सहाय्याने वाहने बाजूला करत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. संबंधित डंपर एका खडी व बांधकाम साहित्य पुरवठा करणाऱ्या कंपनीचा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!