विवरे, ता.रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : शिक्षण विकास मंडळ विवरे संचलित श्री. ग. गो. बेंडाळे हायस्कूल, विवरे येथे शाळेचे शिपाई श्री. सुरेश माणिकराव गायकवाड यांच्या सेवानिवृत्ती निमित्त तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या सत्काराचा भव्य समारंभ उत्साहात संपन्न झाला.
(ads)
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विकास मंडळ विवरे संस्थेचे माजी व्हाइस चेअरमन व विद्यमान संचालक श्री. रामचंद्र वामनराव देशमुख (छोटू पाटील) हे होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक ज्येष्ठ शिक्षक श्री. शरद येवले यांनी केले. प्रारंभी विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
(ads)
यावेळी शाळेतील शिपाई श्री. सुरेश गायकवाड यांचा शाळेतर्फे ड्रेस, शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. माध्यमिक व प्राथमिक विभागाच्या वतीने शिक्षण विकास मंडळ विवरे संस्थेचे माजी अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, अध्यक्ष गोदावरी फाउंडेशन, जळगाव यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
(ads)
समारंभात रावेर शिक्षण संवर्धक संघाचे नवनिर्वाचित चेअरमन श्री. संतोष शेठ अग्रवाल यांचा शाल, पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन गौरव करण्यात आला. तसेच पंचायत समिती रावेर येथे महाराष्ट्र शासनाकडून नव्याने नियुक्त झालेले गटशिक्षणाधिकारी श्री. रवींद्र बखाल यांचाही संस्थेतर्फे विशेष सत्कार करण्यात आला.
(ads)
याच कार्यक्रमात प्रभात विद्यालय, हिंगोणा (ता. यावल) येथील प्रयोगशाळा सहाय्यक, जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे संचालक तसेच फैजपूर नगरपरिषदेचे बिनविरोध नगरसेवक, गटनेते व शिक्षण सभापती श्री. सिद्धेश्वर वाघुळदे यांचा शाल, पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन गौरव करण्यात आला.
(ads)
जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने शिक्षण विकास मंडळ विवरे संस्थेचे चेअरमन प्रा. शैलेश राणे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच शिक्षण विकास मंडळ विवरे संस्थेचे संचालक श्री. किरण पाचपांडे यांची विविध कार्यकारी सोसायटी, विवरे बुद्रुकच्या व्हाइस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेचे माजी विद्यार्थी श्री. विलास सपकाळ यांची पीक संरक्षण सहकारी सोसायटी, विवरे बुद्रुकच्या व्हाइस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल त्यांनाही गौरविण्यात आले.
(ads)
यावेळी मनोगत व्यक्त करताना माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम, शिस्तबद्ध अभ्यास व सातत्यपूर्ण प्रयत्नांचे महत्त्व पटवून दिले. सत्काराला उत्तर देताना गटशिक्षणाधिकारी श्री. रवींद्र बखाल यांनी विवरे गाव व संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी कॉपीसारख्या गैरप्रकारांपासून दूर राहून स्पर्धा परीक्षांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
(ads)
संस्थेचे चेअरमन प्रा. शैलेश राणे यांनी आपल्या मनोगतातून सर्व सत्कारमूर्तींच्या कार्याचा गौरव करीत संस्थेला भेट दिल्याबद्दल मान्यवरांचे आभार मानले. इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु. अक्षदा गाढे हिने सेवानिवृत्त कर्मचारी श्री. सुरेश गायकवाड यांच्या कार्याविषयी भावपूर्ण मनोगत व्यक्त केले.
(ads)
कार्यक्रमास रावेर शिक्षण संवर्धक संघाचे संचालक शैलेंद्रकुमार देशमुख, विजय शेठ लोहार, विवरे बुद्रुकचे माजी सरपंच वासुदेव नरवाडे, शिक्षण विकास मंडळ विवरे संस्थेचे व्हाइस चेअरमन श्री. गोपाळ राणे, सचिव श्री. केशव राणे, मुख्याध्यापक श्री. पी. एच. वायकोळे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. हर्षाली बेंडाळे, सेवानिवृत्त कर्मचारी सुरेश गायकवाड यांचे नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
(ads)
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. नीलिमा नेमाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कला शिक्षक श्री. अर्जुन सोळुंके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कैलास राणे, तेजस पाचपांडे, देवेंद्र फेगडे, प्रतीक वारके तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले .


