तांदलवाडी ता.रावेर(सुवर्ण दिप वृत्तसेवा) :
आषाढी एकादशीचे औचित्य साधून पारस पोदार लर्न स्कूल, रावेर च्या वतीने तांदलवाडी येथे पारंपरिक दिंडी सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. वारकरी वेशभूषेत नटलेल्या बालगोपाळांनी टाळ-मृदंगाचा गजर आणि “ज्ञानोबा-तुकाराम”, “विठ्ठल-विठ्ठल” च्या जयघोषाने संपूर्ण तांदलवाडी परिसर दुमदुमून टाकला.
विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, समृद्ध संत परंपरा आणि सामाजिक मूल्यांची रुजवण व्हावी, या उदात्त उद्देशाने या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सांस्कृतिक सादरीकरणाने जिंकली मने
दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी पारंपरिक संतांचे अभंग गायले. ठिकठिकाणी रंगलेल्या फुगड्या आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी तांदलवाडी ग्रामस्थांची मने जिंकून घेतली. अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात निघालेल्या या दिंडीमुळे गावात एक वेगळाच भक्तिरस निर्माण झाला होता.
मान्यवरांची उपस्थिती व कौतुक
या सोहळ्याला शाळेच्या चेअरमन सुचिता पाटील आणि डॉ. गुलाबराव पाटील, मुख्याध्यापक डॉ. जतीन हिंदुजा, शिक्षक:- मनीषा सोहनी, मयुरा खरे, ममता राठोड, चेतन विश्वकर्मा, स्वप्निल तायडे. कर्मचारी:- सतीश पाटील यांच्यासह सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेने राबवलेल्या या स्तुत्य आणि संस्कृतीचे जतन करणाऱ्या उपक्रमाचे तांदलवाडी ग्रामस्थांनी आणि उपस्थितांनी मनापासून कौतुक केले तसेच विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.


