खिर्डी बुद्रुक येथे रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी उपोषण सुरू; प्रशासनाचे आश्वासन फेटाळले, उपोषणकर्ते भूमिकेवर ठाम!
रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा):
तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथील बस स्टॉप ते जिल्हा परिषद मराठी शाळेदरम्यानच्या रस्त्याची झालेली अत्यंत दुरवस्था आणि प्रशासनाचे सातत्याने होणारे दुर्लक्ष यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अखेर आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. ग्रामपंचायत सदस्य गणेश मनोहर देवगिरकर यांच्यासह ग्रामस्थांनी २6 जुलैपासून ऐनपूर रोडवरील जेडीसीसी बँकेसमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली असून, या आंदोलनाला सर्वपक्षीय पदाधिकारी आणि सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
प्रशासनाचा पाठपुरावा निष्फळ; आंदोलनाचा मार्ग
या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी यापूर्वी २४ जून २०२५ आणि २ जुलै २०२५ रोजी प्रशासनाला निवेदने दिली होती. त्या वेळी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र, दीर्घ कालावधी उलटूनही प्रत्यक्ष काम न झाल्यामुळे खिर्डी बुद्रुककरांचा संयम सुटला आणि ऐन पावसाळ्यात खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांनी उपोषणाचा मार्ग निवडला.
काय आहेत प्रमुख मागण्या
* प्रजिमा १४ (प्रमुख जिल्हा मार्ग) वर साचणाऱ्या पाण्याच्या निचऱ्याची योग्य व्यवस्था करणे.
* रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मुरुम टाकून साईड पट्ट्या भरून घेणे व त्यावर बारीक कच टाकणे.
* रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांच्या जागी डांबरीकरण किंवा सिमेंट रस्ता करून पाणी साचणार नाही अशी सोय करणे.
* बस स्टँड ते टन काटा दरम्यानचा रस्ता तातडीने दुरुस्त करणे.
सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांचा पाठिंबा
२६ जुलै रोजी सकाळी ९ वाजेपासून सुरू झालेल्या या उपोषण स्थळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला. यात प्रभारी सरपंच अतुल पाटील, माजी पं. स. सदस्य दीपक पाटील, घनश्याम पाटील, 'तत्पर फाउंडेशन'चे अध्यक्ष कांतिलाल गाढे, उपाध्यक्ष प्रदीप महाराज, सचिव शेख इद्रीस, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रल्हाद कोचुरे यांसह विविध पक्षांचे आणि संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'तात्पुरती मलमपट्टी नको, दर्जेदार काम करा!'
उपोषणाची दखल घेत रावेर बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. येवले यांनी उपोषण स्थळी भेट दिली आणि रस्त्याची 'तात्पुरती दुरुस्ती' करण्याचे आश्वासन देणारे पत्र देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, *"जोपर्यंत रस्त्याचे पूर्ण आणि दर्जेदार काम सुरू होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही,"* अशी आक्रमक आणि ठाम भूमिका उपोषणकर्ते गणेश देवगिरकर यांनी मांडली.
कडक पोलीस बंदोबस्त
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपोषण स्थळी कोणतीही कायदा व सुव्यवस्थेची समस्या निर्माण होऊ नये यासाठी निंभोरा पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक ममता तडवी, सतीश सानप, सर्फराज तडवी, उमेश नरवाडे आणि गोपनीय शाखेचे अमोल वाघ तसेच तलाठी हर्षल पाटील व पोलीस पाटील रितेश चौधरी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
सदर आंदोलनाची निवेदने जळगावचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, रावेरचे तहसीलदार आणि निंभोरा पोलीस ठाण्याला देण्यात आली असून, आता प्रशासन यावर काय ठोस पाऊल उचलते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
खिर्डी बु येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणास जाहीर पाठिंबा
ग्रामरोजगार सेवक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जाहीर पाठिंबा राज्य संघटक उमेश तायडे,माजी तालुका अध्यक्ष प्रदीप कोचुरे व ऍड मोहन कोचुरे,उपोषण कर्ता गणेश देवगिरकर,माजी ग्रामपंचायत सदस्य जगदीश कोचुरे, तत्पर फाऊंडेशनचे अध्यक्ष कांतिलाल गाढे, सदस्य प्रवीण धुंदले सर, खिर्डी बु चे पोलिस पाटील रितेश चौधरी, वंचित बहुजन आघाडीचे जळगाव जिल्हा उप अध्यक्ष, रफिक बेग, राजू जहुरे, सामाजिक कार्यकर्ते,शिवम कोचुरे, रोहित सोनवणे, मुकेश कोचुरे, पवन तावडे, कलीम शेख, अरहम खान, हे सर्व उपस्थित होते,
या लोकहिताच्या आंदोलनास नैतिक व सामाजिक पाठिंबा जाहीर करत असून प्रशासनाने कोणताही विलंब न करता आमरण उपोषणाच्या मागण्या मार्गी लावाव्या अन्यथा जनभावनेचा आदर राखून पुढील लोकशाही मार्गाने होणाऱ्या आंदोलनातही सहभाग राहील
जनहितासाठीचा हा आमरण उपोषणाचा हा लढा यशस्वी होवो, हीच सदिच्छा



