भदंत नागवंश महाथेरो यांच्या धम्मदेसनेतून पहिली धम्मसंगिती, जेतवन दान व अंगुलिमालाच्या परिवर्तनाचा इतिहास उलगडला
चिनावल ता.रावेर ( राहुल डी गाढे) : भीम ज्योती बुद्ध विहार, चिनावल येथे वर्षावासाचा ३१ वा दिवस आणि श्रावण पौर्णिमेचा पावन प्रसंग अत्यंत भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि धम्ममय वातावरणात साजरा करण्यात आला. पूजनीय भदंत नागवंश महाथेरो (नागपूर) यांच्या पावन सानिध्यात विविध धार्मिक व धम्मविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
(ads)
सकाळी ६ वाजता सुत्तपठण व उपासक-उपासिकांना अष्टशील ग्रहणाचा कार्यक्रम पार पडला. श्रावण पौर्णिमेच्या औचित्याने तब्बल ६७ उपासक-उपासिकांनी श्रद्धेने अष्टशील ग्रहण केले. यावेळी पंचशील ध्वजारोहणाचा कार्यक्रम सौ. सोनाली भीमराव सपकाळे यांच्या हस्ते भक्तिभावाने पार पडला.
सायंकाळी ७ वाजता सामूहिक परित्राण पाठाचे आयोजन करण्यात आले. यावेळी धम्मश्रवणासाठी भीम ज्योती बुद्ध विहार उपासक-उपासिकांनी खचाखच भरून गेला होता.
(ads)
याप्रसंगी भदंत नागवंश महाथेरो यांनी श्रावण पौर्णिमेचे औचित्य साधून भगवान बुद्धांच्या काळातील तसेच बौद्ध धम्माच्या इतिहासातील तीन महत्त्वपूर्ण घटनांवर सोप्या व प्रांजळ भाषेत सविस्तर धम्मदेसना दिली.
तीन ऐतिहासिक घटनांवर धम्मदेसना
पहिली धम्मसंगिती : भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर राजगृह येथे महाकश्यप स्थविरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्या बौद्ध संगीतीचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. बुद्धवचनांचे संकलन व जतन करण्यामध्ये या संगीतीची असलेली भूमिका त्यांनी विशद केली.
अनाथपिंडिकांचे जेतवन विहार दान : दानशूर श्रेष्ठी अनाथपिंडिक यांनी सोन्याच्या नाण्यांनी जमीन झाकून भगवान बुद्धांना जेतवन विहार अर्पण केल्याची प्रेरणादायी कथा सांगत दानाचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले.
(ads)
अंगुलिमालाचे हृदयपरिवर्तन : क्रूर व हिंसक अंगुलिमालाचा भगवान बुद्धांच्या करुणा, मैत्री आणि धम्माच्या प्रभावामुळे झालेला हृदयपरिवर्तनाचा प्रसंगही त्यांनी प्रभावीपणे मांडला. बुद्धांच्या करुणेने एका हिंसक व्यक्तीचे जीवन कसे बदलले, याचा प्रेरणादायी संदेश यावेळी देण्यात आला.
उपस्थित उपासक-उपासिकांनी धम्मदेसना अत्यंत एकाग्रतेने व मनापासून श्रवण केली. कार्यक्रमाच्या सांगतेनंतर उपस्थितांना गोड खीरदान करण्यात आले.
(ads)
६ सप्टेंबर रोजी महिला धम्म प्रशिक्षण शिबिर
दरम्यान, ६ सप्टेंबर रोजी महिला धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भीम ज्योती बुद्ध विहाराचे अध्यक्ष आदरणीय संजय भालेराव यांनी विहारातील तसेच परिसरातील सर्व माता-भगिनींना या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
(ads)
महाप्रजापती गौतमींपासून माता रमाई आणि पूज्य डॉ. सविता आंबेडकर यांच्यापर्यंत महिलांनी धम्माच्या वाटचालीत दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. कुटुंबावर तसेच भावी पिढीवर धम्माचे उत्तम संस्कार रुजविण्यासाठी महिलांनी धम्मज्ञानाने समृद्ध होणे आवश्यक असल्याचे संजय भालेराव सर यांनी सांगितले.
(ads)
दैनंदिन कामांच्या व्यापातून वेळ काढून महिलांनी स्वतःच्या आत्मिक व धम्म प्रगतीसाठी या शिबिरात सहभागी व्हावे आणि परिसरातील जास्तीत जास्त उपासिकांनी आपली नावे लवकरात लवकर नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भीम ज्योती बुद्ध विहार समिती, उपासक-उपासिका संघ, चिनावल यांनी परिश्रम घेतले.




