यावल ( सुरेश पाटील )
तालुक्यातील अकलूद येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल,मध्ये भाऊ-बहिणीच्या प्रेम, विश्वास, स्नेह आणि परस्पर संरक्षणाचे प्रतीक असलेला पवित्र रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात,आनंदात आणि आपुलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
रक्षाबंधनानिमित्त शाळेच्या प्रांगणात भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेली भव्य व आकर्षक राखीची प्रतिकृती साकारण्यात आली होती. सकाळच्या सभेत इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाच्या गीतावर सुंदर नृत्य सादर करून वातावरणात उत्साह निर्माण केला.
(ads)
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या राखी बनविण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थिनींपैकी विजेत्या विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या सुंदर व आकर्षक राख्या शाळेचे आदरणीय प्राचार्य सचिन बानसोडे सर यांच्या हातावर बांधल्या.शाळेचे पालक व संरक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते करीत असलेल्या योगदानाबद्दल विद्यार्थिनींनी कृतज्ञता व्यक्त केली.याप्रसंगी विद्यार्थिनींच्या समूहाने रक्षाबंधनाचे सुंदर गीत सादर केले.
(ads)
कार्यक्रमादरम्यान सूत्रसंचालकांनी भाऊ-बहिणीच्या नात्यावर आधारित मनोरंजक खेळाचे आयोजन केले.विद्यार्थ्यांनी आपल्या भाऊ किंवा बहिणीच्या आवडी-निवडी व खासियत ओळखत या खेळात उत्स्फूर्त सहभाग घेतला.त्यामुळे कार्यक्रमात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
(ads)
प्राचार्यांचे मार्गदर्शन
यावेळी शाळेचे आदरणीय प्राचार्य सचिन बनसोडे सर यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ते म्हणाले, “रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नसून प्रेम, विश्वास,आदर,स्नेह आणि एकमेकांच्या सुख-दुःखात सदैव साथ देण्याची भावना जपणारा सण आहे.राखीचा धागा आपल्याला आपल्या नात्यांची किंमत समजून घेण्यास आणि एकमेकांच्या सुरक्षिततेची, सन्मानाची व आनंदाची काळजी घेण्याची प्रेरणा देतो. विद्यार्थ्यांनी या सणातून प्रेम,आपुलकी, सहकार्य आणि परस्पर आदर यांसारखी मूल्ये आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणावीत.”
(ads)
तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना “आपल्या प्रत्येक नात्यात विश्वास आणि सन्मान जपा, एकमेकांना मदत करा आणि समाजात प्रेम व बंधुभावाची भावना वाढवा,” असा संदेश दिला.
संपूर्ण कार्यक्रम आनंद, उत्साह आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाचे सांस्कृतिक, सामाजिक आणि भावनिक महत्त्व समजून घेण्याची तसेच प्रेम, विश्वास, आदर आणि परस्पर सहकार्याची मूल्ये आत्मसात करण्याची सुंदर संधी मिळाल्याची माहिती पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य यांनी दिली.


