रावेर (राहुल डी गाढे) : रावेर नगर परिषदेची हद्दवाढ होऊन तब्बल तीन वर्षांचा कालावधी उलटला, तरी श्रीकृष्ण नगर, शांतीदूत नगर, शिक्षक कॉलनी आणि पीपल कॉलनी परिसरातील रहिवाशांना मूलभूत नागरी सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. नियमित कर भरूनही या भागात सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. सांडपाणी उघड्यावर साचत असल्याने परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे.
तीन वर्षे उलटली, सुविधा कुठे? नागरिकांचा संतप्त सवाल
हद्दवाढीनंतर नागरिकांना नगर परिषदेच्या सेवाक्षेत्रात समाविष्ट करण्यात आले, परंतु रस्ते, पाणी, स्वच्छता आणि गटार व्यवस्था यांसारख्या प्राथमिक सुविधा पुरवण्यात प्रशासन साफ अपयशी ठरल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून होत आहे. सांडपाणी वाहून नेण्यासाठी योग्य नाले किंवा भूमिगत गटार नसल्याने पाऊस आणि सांडपाणी एकत्र येऊन दुर्गंधी पसरत आहे. यामुळे परिसरात डासांची उत्पत्ती वाढून साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
"कर वसुली नियमित, सुविधा मात्र कागदावरच!"
रावेर नगर परिषद कर वसुलीच्या बाबतीत तत्परता दाखवते, मात्र सुविधा देण्याच्या वेळी प्रशासनाची भूमिका उदासीन असते, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. “आम्ही नियमित कर भरतो, मग आमच्या आरोग्याशी असा खेळ का? स्वच्छता आणि गटार व्यवस्था कधी सुधारणार?” असा थेट प्रश्न संतप्त रहिवाशांनी प्रशासनाला विचारला आहे.
नागरिकांची मागणी:
- श्रीकृष्ण नगर, शांतीदूत नगर, शिक्षक कॉलनी व पीपल कॉलनी परिसरात तात्काळ पाहणी करावी.
- सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी कायमस्वरूपी गटार व्यवस्था उभी करावी.
- परिसरात नियमित साफसफाई करून जंतुनाशक फवारणी करावी.
आता नगर परिषदेने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी जोरदार मागणी या कॉलनी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
स्वच्छतेवर लाखो रुपयांचा चुराडा, तरीही रावेरमध्ये घाणीचे साम्राज्य; कचरा गाड्यांचा फज्जा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात ?
रावेर नगर परिषदेकडून शहराच्या स्वच्छतेसाठी आणि आरोग्य व्यवस्थेसाठी दरमहा लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात असल्याचा दावा केला जातो. परंतु, प्रत्यक्षात मात्र शहरातील विविध कॉलनींमध्ये कचऱ्याचे ढीग साचले असून सांडपाणी उघड्यावर वाहत आहे. नगर परिषदेच्या कचरा गाड्या वेळेवर येत नसल्यामुळे सर्वदूर दुर्गंधी पसरली असून, पालिकेच्या या गलथान कारभारामुळे नागरिकांचे आरोग्य पूर्णपणे धोक्यात आले आहे.
आतापर्यंत ठेका झालेला नव्हता परंतु आता ठेका झाला आहे. ठेका पूर्ण झाला की या सुविधा लोकांना मिळतील आणि सध्या हद्दवाढ झाल्यामुळे अपुऱ्या कर्मचारी मुळे कॉलनी परिसरात वेळेवर सफाई कचरा गाड्या वेळेवर पोहचत नाहीये लवकरच ठेका होईल आणि ही समस्या सुटेल
आसिफ दारा मोहम्मद(उपनगराध्यक्ष, रावेर न. पा.)


