अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात रावेरमध्ये एल्गार; हजारो समाजबांधवांचा भव्य आक्रोश मोर्चा
रावेर (राहुल डी गाढे) : अनुसूचित जातींच्या १३ टक्के आरक्षणातील उपवर्गीकरणाचा (वर्गीकरणाचा) प्रस्ताव तात्काळ रद्द करण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी रावेर शहरात अनु.जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने हजारो भीमसैनिक व समाजबांधवांचा अभूतपूर्व आणि भव्य 'आक्रोश मोर्चा' काढण्यात आला. या मोर्चात महिला, युवक, नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते.
(ads) रावेर शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या या मोर्चात उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. मोर्चाच्या शेवटी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने रावेरच्या तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
(ads)
- प्रमुख वक्त्यांचे मनोगत:
मोर्चादरम्यान आयोजित सभेत मनोहर तायडे, ॲड. दीपक तायडे, आत्माराम तायडे, ॲड.योगेश गजरे,दिलीप कांबळे आणि आनंद बाविस्कर यांनी आपले विचार मांडले. आरक्षणातील उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींच्या ऐक्याला तडा जाऊन अन्याय होण्याची शक्यता असल्याने हा प्रस्ताव केंद्र व राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावा, असा सूर सर्व वक्त्यांच्या भाषणातून उमटला.
(ads) - कार्यक्रमाचे संयोजन: कार्यक्रमाची प्रास्ताविक भूमिका उमेश गाढे यांनी मांडली, तर संपूर्ण सभेचे सूत्रसंचालन प्रदीप सपकाळे यांनी केले. उपस्थितांचे आभार संघरत्न दामोदरे यांनी मानले.
- प्रमुख उपस्थितांची नोंदणी: या आक्रोश मोर्चात कृती समितीचे पदाधिकारी राजेंद्र अटकाळे, संघरक्षक तायडे, बाळू शिरतुरे, दिलीप साबळे, सावन मेढे, महेश तायडे, राहुल डी गाढे, विजय भोसले, विजय अवसरमल, विनोद मोरे, महेंद्र कोचुरे, साहेबराव वानखेडे, रवी तायडे, ॲड. आनंद वाघोदे, सदाशिव निकम, रवींद्र रायपुरे, अक्षय तायडे आणि चांगो भालेराव यांच्यासह नगरसेवक नरेंद्र वाघ (पिंटू भाऊ) व नगरसेविका अनिता तायडे या लोकप्रतिनिधींनी आणि हजारो समाजबांधवांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
या यशस्वी आयोजनासाठी अनु.जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी मोर्चा कृती समिती, रावेर तालुका यांच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.



