यावल नगरपरिषद मुख्याधिकारी निशीकांत गवई कार्यालयात अनियमित; जिल्हाधिकाऱ्यांकडे नितीन सोनार यांची तक्रार

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल (सुरेश पाटील): यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निशिकांत गवई हे नगरपरिषद कार्यालयात अनियमितपणे उपस्थित राहत असल्याची गंभीर तक्रार रावेर लोकसभा क्षेत्र शिवसेना (शिंदे गट) जिल्हा उपसंघटक नितीन सोनार यांनी जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केली आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभारामुळे शहरातील विकासकामे व प्रशासकीय कामे खोळंबली असून, या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी काय कारवाई करतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

(ads) 

Jalgaon जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे की, मुख्याधिकारी हे नगरपरिषदेच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजाचे प्रमुख अधिकारी असतात. कार्यालयीन कामकाज, कर्मचाऱ्यांवर नियंत्रण, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण, शासकीय पत्रव्यवहार, विविध विकासकामे, आर्थिक व प्रशासकीय प्रस्ताव आणि नगरपरिषद सभागृहातील ठरावांची अंमलबजावणी यामध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. मात्र, मुख्याधिकारी हे सक्षम प्राधिकाराची कोणतीही पूर्वपरवानगी किंवा पूर्वकल्पना न देता कार्यालयीन वेळेत अनुपस्थित राहत असल्याने नागरिकांना व प्रशासनाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

(ads) 

अचानक भेट देऊन सखोल चौकशीची मागणी

प्रसासकीय कामकाजाचा बोजवारा उडाल्याने याची जबाबदारी निश्चित होणे आवश्यक असून निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत यावल नगरपरिषदेस अचानक भेट देऊन सखोल व वस्तुनिष्ठ तपासणी करण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे.

(ads) 

तक्रारीतील प्रमुख मागण्या:

  • अभिलेखांची तपासणी: मुख्याधिकाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी, रजा, दौरे आणि अनुपस्थितीच्या नोंदींची सखोल चौकशी व्हावी.
  • नोंदी सुरक्षित ठेवणे: चौकशी दरम्यान किंवा चौकशीपूर्वी संबंधित हजेरी पट व महत्त्वाचे अभिलेख सुरक्षित ठेवण्याचे निर्देश यावल नगरपालिकेला दिले जावेत.
  • प्रलंबित कामांची चौकशी: अनुपस्थितीमुळे नागरिकांची खोळंबलेली कामे आणि तक्रार नोंदींची चौकशी केली जावी.
  • बदली व शिस्तभंगाची कारवाई: निष्पक्ष चौकशी करून कर्तव्यात कसूर आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई करावी आणि मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीचा प्रस्ताव सक्षम प्राधिकार्‍याकडे पाठवावा.

शिवसेना शिंदे गटाच्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यामुळे यावल नगरपालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!