रावेर (राहुल डी गाढे) : रावेर तालुक्यातील भोकरी गावातील बुद्ध विहार येथे वर्षावास मालिकेतील विशेष कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात पार पडला. या प्रसंगी उपस्थित बौद्ध उपासक-उपासिकांना धम्म विचार आणि संघटनात्मक बांधणी यांवर मान्यवरांकडून मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना भारतीय बौद्ध महासभेचे रावेर तालुका कोषाध्यक्ष आयु. महेंद्र वानखेडे यांनी तथागत गौतम बुद्धांच्या "प्रतीत्यसमुत्पाद (कार्यकारणभाव)" या महत्त्वपूर्ण सिद्धांतावर सविस्तर प्रकाश टाकला. जगात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे विशिष्ट कार्य-कारण संबंध असतो, हा बुद्धांचा संदेश त्यांनी सोप्या भाषेत पटवून दिला.
भारतीय बौद्ध महासभेचे रावेर तालुका अध्यक्ष गौतम अटकेळे गुरुजी यांनी "गाव तेथे शाखा, घर तेथे सैनिक" ही संकल्पना मांडली. धम्म चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि समाजसंघटन मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने सक्रिय योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.
तालुका सरचिटणीस ॲड. दीपक तायडे सर यांनी "चलो बुद्ध की ओर!" ही हाक देत बुद्धांचा करुणा आणि समतेचा विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याची गरज व्यक्त केली.
प्रमुख उपस्थिती व सूत्रसंचालन:
या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आयु. महेंद्र वानखेडे, गौतम अटकळे गुरुजी, ॲड. दीपक तायडे सर आणि सदाशिव निकम गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कार विभागाचे तालुका उपाध्यक्ष सदाशिव निकम गुरुजी यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. कार्यक्रमाला भोकरी व परिसरातील बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.




