सावदा पोलिसांची मोठी कारवाई; ट्रकच्या चोरीच्या बॅटऱ्यांसह एकाला अटक : संशयास्पद हालचालींवरून पोलिसांचा पाठलाग; मोटारसायकलसह ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



 सावदा पोलिसांची मोठी कारवाई; ट्रकच्या चोरीच्या बॅटऱ्यांसह एकाला अटक : संशयास्पद हालचालींवरून पोलिसांचा पाठलाग; मोटारसायकलसह ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त


सावदा (अक्षय वाघ) : सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रगस्ती दरम्यान संशयास्पदरीत्या ट्रकच्या बॅटऱ्या घेऊन जाणाऱ्या दोन इसमांचा पोलिसांनी पाठलाग करून एका आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीच्या तीन ट्रक बॅटऱ्या तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दुसरा आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाला आहे.

(ads)

दिनांक २७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११ ते २८ ऑगस्ट रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत सावदा पोलीस कर्मचारी व होमगार्ड हतनूर धरणाकडून हतनूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्रगस्त घालत होते. दरम्यान, रात्री सुमारे १.३० वाजता उदळी गावाच्या बसस्थानकाजवळ एका CBZ Xtreme मोटारसायकलवर दोन इसम गोणपाट घेऊन संशयास्पदरीत्या जाताना पोलिसांच्या निदर्शनास आले.

(ads)

पोलिसांनी मोटारसायकल थांबविण्याचा इशारा केला असता दोन्ही इसमांनी पोलिसांना हुलकावणी देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ त्यांचा पाठलाग सुरू केला. सुमारे १.४५ वाजता पोलिसांनी त्यांना गाठले. मात्र, मोटारसायकल चालकाने अंधाराचा फायदा घेत गल्लीबोळातून पळ काढला. मागे बसलेल्या इसमाला पोलिसांनी जागीच ताब्यात घेतले.

(ads)

ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव विशाल शांताराम कोळी (वय २८, रा. कडगाव, ता. यावल, जि. जळगाव) असे आहे. तर पळून गेलेल्या आरोपीचे नाव मोहन प्रकाश कोळी (रा. कडगाव, ता. यावल) असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी आरोपीकडील गोणपाटाची तपासणी केली असता त्यामध्ये ट्रकच्या तीन मोठ्या बॅटऱ्या आढळून आल्या. बॅटऱ्यांबाबत आरोपीकडे चौकशी केली असता त्याने समाधानकारक माहिती दिली नाही. सदर बॅटऱ्या जळगाव शहरातील रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकमधून काढून चोरून आणल्याचा संशय असल्याने पोलिसांनी त्या जप्त केल्या.


जप्त मुद्देमाल


- MH.19.BF.9347 क्रमांकाची काळ्या रंगाची CBZ Xtreme मोटारसायकल – ₹५०,०००

- QUICK START WF1000 कंपनीची ट्रक बॅटरी – ₹७,०००

- REVOLT AUTOMATIC BATTERY कंपनीची ट्रक बॅटरी – ₹७,०००

- GLOBAL KP25K कंपनीची ट्रक बॅटरी – ₹७,०००


अशाप्रकारे एकूण ₹७१,००० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

(ads)

या प्रकरणी पोलीस कर्मचारी सुनील जानकिराम कुरकुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सावदा पोलीस ठाण्यात FIR क्र. ०२२२/२०२६, मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सावदा पोलीस करीत आहेत.

(ads)

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित व उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड, पोहेका अक्षय हिरोळे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील कुरकुरे, संजय तडवी तसेच होमगार्ड प्रशांत पाटील व संतोष सपकाळे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!