ऐनपूर : सरदार वल्लभभाई पटेल कला आणि विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर येथे आज, ३१ ऑगस्ट रोजी भटके-विमुक्त दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी भटक्या-विमुक्त जातींची सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक स्थिती तसेच या समाजाच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाची भूमिका याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
(ads)
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. महेंद्र सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. आपल्या व्याख्यानात त्यांनी सांगितले की, ब्रिटिश सरकारने १८७१ मध्ये ‘गुन्हेगारी जमाती कायदा’ (Criminal Tribes Act) लागू केला. या कायद्यामुळे काही जातींवर अन्याय झाला आणि त्यांना जन्मतःच गुन्हेगार ठरविण्यात आले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९५२ मध्ये हा कायदा रद्द करण्यात आला. त्यानंतर या घटकांना ‘विमुक्त जाती’, अर्थात बंधनातून मुक्त झालेल्या जाती, अशी नवी ओळख मिळाली.
(ads)
भटक्या-विमुक्त समाजाच्या आर्थिक विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध कर्ज योजना राबविल्या जातात. तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत विद्यार्थी व नागरिकांसाठी विविध शैक्षणिक शिष्यवृत्ती तसेच परदेशी शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते, अशी माहिती प्रा. डॉ. महेंद्र सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना दिली.
(ads)
या कार्यक्रमास प्रा. डॉ. सतीश वैष्णव, प्रा. डॉ. पीरू गवळी, प्रा. डॉ. विनोद रामटेके, प्रा. व्ही. एच. पाटील, सर्व शिक्षकेतर कर्मचारी तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रदीप तायडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. भोपे सर यांनी केले.



