भुसावळमध्ये भूमी अभिलेख कार्यालयाचा शिपाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात; सायबर कॅफे चालकासह दोघे ताब्यात

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल (सुरेश पाटील)

शेतजमिनीच्या मोजणी प्रकरणातील त्रुटी ( त्रुटींची पूर्तता ) दूर करण्यासाठी १,००० रुपयांची लाच मागणारा भूमी अभिलेख कार्यालयाचा शिपाई आणि त्याच्या सांगण्यावरून लाच स्वीकारणारा मध्यस्थ सायबर कॅफे चालक,या दोघांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. ही कारवाई आज शुक्रवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १३:३२ वाजता भुसावळ येथील जामनेर रोडवरील नेहते हॉस्पिटलजवळ करण्यात आली.  

नेमके प्रकरण काय ?

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार (वय ३६ वर्षे, नोकरी) यांची मौजे गोजोरे (ता. भुसावळ) शिवारात शेतजमीन आहे. सदर जमिनीची मोजणी करण्यासाठी त्यांनी ५ सप्टेंबर २०२६ रोजी भुसावळ येथील 'चव्हाण सायबर कॅफे'मधून ऑनलाईन अर्ज करून २,००० रुपयांचे चलन भरले होते. त्यानंतर ३० सप्टेंबर रोजी तक्रारदारांना अर्जात त्रुटी असल्याचा टेक्स्ट मेसेज आला.  

त्याबाबत चौकशी करण्यासाठी तक्रारदारांनी सायबर कॅफे चालक राकेश रामदास चव्हाण याला फोन केला असता, त्याने भुसावळ भूमी अभिलेख कार्यालयातील लोकसेवक सचिन किसन पाटील ( शिपाई ) याच्याशी बोलणे झाले असून "तुझे काम होऊन जाईल," असे सांगितले. 


१,००० रुपयांची लाच मागितली

१६ ऑक्टोबर २०२६ रोजी सायबर कॅफे मालक राकेश चव्हाण याने तक्रारदाराला फोन करून शेत मोजणीतील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी शिपाई सचिन पाटील याच्यामार्फत १,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली.  

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लागलीच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), जळगाव येथे तक्रार नोंदवली.

ACB चा सापळा अन् रंगेहात अटक!

प्राप्त तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचसमक्ष पडताळणी केली असता,शिपाई सचिन पाटील याने १,००० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.  

त्यानंतर पथकाने सापळा रचला. जामनेर रोडवरून हनुमान नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नेहते हॉस्पिटलजवळ,सायबर कॅफे चालक राकेश चव्हाण याने तक्रारदाराला लाचेची रक्कम सचिन पाटील याला देण्यास प्रोत्साहन देऊन,स्वतः ती रक्कम सचिन पाटील याच्याकरिता स्वीकारली.रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले.  

आरोपींची माहिती --१. सचिन किसन पाटील (वय ४५ वर्षे, नोकरी-शिपाई, उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, भुसावळ रा.निवृत्ती नगर, मुक्ताईनगर )२. राकेश रामदास चव्हाण (वय ४३ वर्षे, व्यवसाय-सायबर कॅफे चालक; रा. तापी नगर, भुसावळ)  


सदर प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कारवाई करणारे पथक व मार्गदर्शन सापळा अधिकारी हेमंत नागरे (पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि., जळगाव)  

पर्यवेक्षक अधिकारी योगेश ठाकूर (पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि., जळगाव)  

सापळा पथक: पोहेकॉ/किशोर महाजन, पोकॉ/मनोज पाटील, पोकॉ / प्रणेश ठाकूर  

मार्गदर्शन भारत तांगडे (पोलीस अधीक्षक), प्रदीप मैराळे (अप्पर पोलीस अधीक्षक),श्रीमती कविता फडतरे ( अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र ) 

 

नागरिकांना आवाहन--

कोणत्याही शासकीय कामासाठी लोकसेवक किंवा त्यांच्या वतीने कोणी लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव किंवा टोल फ्री क्र. १०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर यांनी केले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!