यावल ( सुरेश पाटील )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजोरे तालुका यावल येथे नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून 'स्त्री शक्तीचा जागर' हा विशेष उपक्रम अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजाच्या सुरक्षेची धुरा सांभाळणाऱ्या तालुका पोलीस कार्यालयाच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल सौ.मीनाक्षी तडवी आणि सौ. सपना सोनवणे यांचा विशेष गौरव करण्यात आला.
श्रमसृष्टी मुक्ताई आता पोलीस परसबागे'ची पाहणी व भाजीपाला तोडणी
कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील 'श्रमसृष्टी मुक्ताई परसबाग' येथील भाजीपाला तोडणीने झाली. दोन्ही महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या हस्ते परसबागेतील वांगी, भेंडी, गवार, मेथी व कोथिंबीर अशा ताज्या भाजीपाल्याची तोडणी करण्यात आली. शाळेचे नियोजन, विद्यार्थ्यांचे कष्ट आणि निसर्गाशी जोडलेली ही सुंदर परसबाग पाहून उपस्थितांनी शाळेचे तोंडभरून कौतुक केले. याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष सागरभाऊ कोळी व ग्रामस्थांशी परसबागेच्या यशस्वी उपक्रमाविषयी सविस्तर चर्चा झाली.
ST ड्रायव्हर ते चंद्रयाना चालवण्यापर्यंत स्त्रियांची गरुडझेप गेली आहे म्हणूनच त्या महिलांच्या कार्याचा गौरव या नवरात्रीत झाला पाहिजे असे मत कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक रवींद्र पाटील यांनी 'स्त्री शक्तीचा जागर' उपक्रमाची पार्श्वभूमी मांडताना सांगितले. "आजची स्त्री ही केवळ चूल आणि मुलांपुरती मर्यादित नसून विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करणे हेच या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे," असे मत त्यांनी व्यक्त केले.
(ads)
मूकनाट्यातून सामाजिक विकृतींवर प्रहार करण्यासाठी कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थिनींनी सादर केलेले मूकनाट्य हे मुख्य आकर्षण ठरले.स्त्री भ्रूणहत्या, बालविवाह, अंधश्रद्धा,हुंडाबळी,गरिबी आणि लिंगभेदभाव यांसारख्या सामाजिक विकृतींचा संहार करून साक्षात जगदंबा मातेने स्त्रीशक्तीचे रूप कसे धारण केले,याचा प्रभावी संदेश विद्यार्थिनींनी विना शब्द, केवळ आपल्या उत्कृष्ट हावभावातून दिला.या मूकनाट्याने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थिनींच्या या कलेचे कौतुक म्हणून पोलीस कॉन्स्टेबल भगिनींनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे बक्षीस म्हणून वाटप केले.तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेले स्वागतगीत आणि 'भारत माता' विषयावरील अभ्यासपूर्ण भाषण यातून शाळेची उत्कृष्ट शिस्त व विद्यार्थ्यांचा सभाधीटपणा दिसून आला.
(ads)
गुड टच-बॅड टच व सामाजिक भान यावर मार्गदर्शन
करताना पोलीस कॉन्स्टेबल सौ. मीनाक्षीताई तडवी यांनी भावूक होऊन, "या शाळेत पुन्हा विद्यार्थी बनून दाखल व्हावे, परसबागेत काम करावे आणि गुरुजींकडून शिस्तीचे धडे घ्यावेत," अशी इच्छा व्यक्त केली.तर सौ. सपना सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना 'गुड टच आणि बॅड टच' या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. समाजात वावरताना स्वतःचे रक्षण कसे करावे आणि सतर्क कसे राहावे, याचे व्यावहारिक दाखले त्यांनी दिले.तसेच शाळेची गुणवत्ता, शिक्षकांची मेहनत आणि दातृत्वाची भावना यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
(ads)
या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.योगिता पाटील,सदस्या सुनंदाताई पाटील, माधुरी कोळी, शिक्षणप्रेमी भाग्यश्री महाजन, पूजा बिराडे,सौ.सरला जावळे, यांच्यासह ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नेटके आणि सूत्रबद्ध संचालन शाळेतील उपशिक्षिका सौ.वैशाली पाटील यांनी केले. तर उपस्थितांचे आभार मानणाऱ्या आभारगीताने कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.



