ऐनपूर महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


पुस्तकांमुळे माणूस घडतो; वाचन संस्कृती जोपासणे काळाची गरज – प्रा. डॉ. महेंद्र सोनवणे

ऐनपूर : येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. एन. वैष्णव होते, तर प्रमुख वक्ते म्हणून मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. महेंद्र सोनवणे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. वैष्णव यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या महान कार्याचा आढावा घेतला. विज्ञान, तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान तसेच विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे त्यांचे विचार यांविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

प्रमुख वक्ते प्रा. डॉ. महेंद्र सोनवणे यांनी आपल्या व्याख्यानात १५ ऑक्टोबर हा डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस असून तो वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जात असल्याचे सांगितले. महाराष्ट्र शासनाने वाचन संस्कृती रुजविणे, मराठी भाषेचा विकास व प्रसार करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे या उद्देशाने हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘वाचाल तर वाचाल’ हा केवळ सुविचार नसून मानवी जीवनाला योग्य दिशा देणारा विचार आहे, असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय लावून घ्यावी, असे आवाहन केले. आजच्या मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगात पुस्तकांशी मैत्री टिकवून ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. डॉ. कलाम हे स्वतः उत्तम वाचक होते. पुस्तकांमुळे व्यक्तिमत्त्व घडते आणि विचारांना नवी दिशा मिळते. त्यामुळे दररोज काही वेळ पुस्तकांच्या वाचनासाठी देणे, हीच डॉ. कलाम यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.

यावेळी त्यांनी मराठी विश्वकोशाचे महत्त्व विशद करत वाचन प्रेरणा दिनानिमित्त शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि ग्रंथालयांमध्ये सामूहिक वाचन, ग्रंथप्रदर्शने, पुस्तक मेळावे, कविता वाचन, निबंध स्पर्धा तसेच वाचनविषयक व्याख्यांचे आयोजन केले जात असल्याची माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रदीप तायडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. व्ही. एच. पाटील यांनी केले. या प्रसंगी प्रा. डॉ. गवळी, महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!