रावेर : सरकारी नोकरी लावून देण्याचे व लग्न करण्याचे आमिष दाखवून २३ वर्षीय युवतीची फसवणूक करून लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेला खानापूर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा तत्कालीन शाखा व्यवस्थापक नितीन यशवंत शेंडे (३४) यास १३ जानेवारी रोजी उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला आहे. [ads id="ads1"]
यानंतर शेंडे हा रावेर पोलिसात अटकेसाठी स्वतः समर्पित होऊन पोलिसांसमोर शरण आला असता वैद्यकीय तपासणीत तो कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने १४ दिवसांपासून गृहविलगीकरणातून त्याला अटकेपासून दिलासा मिळाला आहे.[ads id="ads2"]
खानापूर येथील सेंट्रल बैंक ऑफ इंडियाचा तत्कालीन शाखा व्यवस्थापक नितीन यशवंत शेंडे (वय ३४) रा. नागपूर याच्याविरुद्ध सरकारी नोकरी लावून देण्याचे व लग्न करण्याचे आमिष दाखवून तब्बल पावणेदोन वर्षे बँकेच्या कार्यक्षेत्रातील एका गावातील २३ वर्षीय अविवाहित तरुणीवर अत्याचार करून फसवणूक केल्याप्रकरणी रावेर पोलिसात १६ ऑगस्ट २०२१ रोजी बलात्काराचा व फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, तेव्हापासून १३ जानेवारी पावेतो त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अंतरिम जामीन दिल्याने त्यास दिलासा मिळाला होता. दरम्यान, १३ रोजी औरंगाबाद खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत त्याचा अटकपूर्व जामीन खंडपीठाने फेटाळून लावल्याने १७ जानेवारी रोजी तो रावेर पोलीस स्टेशनमध्ये अटकेसाठी स्वतःहून शरण येऊन समर्पित झाला. फौजदार मनोहर जाधव यांनी त्याचा जाबजबाब घेतला.
आरोपी शेंडे याच्या कोविड चाचणीबाबत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत चव्हाण यांनी सांगितले की, लक्षणे नसलेल्या कोविडची लागण आढळून आली असल्याने संबंधित आरोपीला गृहविलगीकरणासाठी औषधोपचार देण्यात आला आहे.
हेही वाचा : - ट्रॅक्टर उलटून दोघे भाऊ ठार ; भुसावळ तालुक्यातील घटना
आरोपीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह येताच पोलीस स्टेशनमध्ये एकच खळबळ उडाली. फौजदार मनोहर जाधव व त्यांच्या लगतच्या सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक यांच्या सॅनिटायझरची फवारणी करून मास्क लावण्याची खबरदारी बाळगली आहे. दरम्यान आरोपी निगेटीव्ह झाल्यावर अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

