सिन्नर जि.नाशिक (वृत्तसेवा) : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कासारवाडी परिसरात झालेली रस्त्यांची कामे अर्धवट स्थितीत आहेत. ना साइडपट्टीची कामे झाली, ना गटारींची कामे झाली. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी बांधलेल्या मोऱ्या अर्धवट स्थितीत आहेत. तरीही कामे पूर्ण झाल्याचा दाखला देण्यात आला आहे. कामाच्या चौकशीची मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे जिल्हासंपर्क प्रमुख बबन जगताप यांनी केली आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंत्यांना तसे पत्र दिले आहे. तीन मार्गावर साइडपट्टी व साइड गटार दाखवा, रोख २५ हजार रुपये बक्षीस मिळवा, अशी बक्षीस योजनाच जगताप यांनी जाहीर केली आहे.[ads id="ads1"]
कासारवाडी-नळवाडी रस्ता, कासारवाडी-डोंगरगाव रस्ता व नळवाडी-चिकणी रस्ता या तीन मार्गावर साइडपट्टी, गटार आदी कामे अपूर्ण आहेत. या तीन मार्गावर कामे अपूर्ण असूनही काम पूर्णत्वाचा दाखला देऊन मोजमाप पुस्तिकेत तशा नोंदी घेतल्या आहेत. या रस्त्यांवरून प्रवास करताना दोन चारचाकी वाहने समोरासमोर आल्यास पास होत नाहीत. यामुळे वाहनचालकांची गैरसोय होते. याबाबत कुठलाही विचार न करता रस्ता पूर्णत्वाचा दाखला कसा दिला, असा प्रश्न संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.[ads id="ads2"]
कासारवाडी-नळवाडी रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे-झुडपे यामुळे वाहनाचा अपघात होऊन एका युवकास प्राणास मुकावे लागले आहे. तर दोन तरुणांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे तक्रारीची दखल घ्यावी, अशी मागणी जगताप यांनी केली आहे.
आठ दिवसांत कासारवाडी-नळवाडी रस्ता, कासारवाडी-डोंगरगाव रस्त्याबाबत कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
"मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतुन कोट्यावधी रुपये खर्च करून ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास केला जातो. मात्र खरेतर हा सगळा चोरबाजार आहे. ग्रामसडक योजना राबविणारी यंत्रणाच ठेकेदारांची बटीक होऊन काम करीत असेल तर नक्की ग्रामीण रस्त्यांचा विकास होण्याऐवजी मक्तेदार आणि महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या सभ्येतेचा आव आणणाऱ्या यंत्रणेचाच विकास होईल यात शंका नाही.सदर योजनेची कामे अपुर्ण ठेवून काम पुर्णत्वाचे दाखले देणाऱ्या व घेणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत, जेणेकरून यापुढे होणारी कामे दर्जेदार व मुदतीत पुर्ण होतील"-बबनराव जगताप