रावेर तालुक्याला वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने गुरुवारी संध्याकाळी जोरदार तडाखा दिला असून शेतकऱ्यांच्या केळी व मका पिकाचे सुमारे 9 कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या वादळाचा 34 गावांना फटका बसला असून 251 शेतकऱ्यांचे 226 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. आमदार अमोल जावळे यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आज सकाळी प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार दीपा जेधे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके यांनी नुकसानीची पाहणी करीत पंचनाम्याला सुरुवात केली.
(ads)
रावेर व यावल तालुक्यात काल संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठा तडाखा दिला. कापणीला आलेल्या शेकडो हेक्टरवरील केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून मक्याच्या पिकांनाही मोठा फटका बसला आहे.
(ads)
गेल्या काही दिवसांपासून परिसरात अवकाळी पावसाची हजेरी होती. मात्र काल झालेल्या वादळी पावसाने अक्षरशः कहर केला. प्रचंड वाऱ्यामुळे कापणीसाठी तयार असलेल्या केळी बागा मोडून पडल्या असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांपुढे गंभीर संकट उभे ठाकले आहे.
(ads)
सुमारे पाऊण तास विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर कायम राहिला. या पावसामुळे काही ठिकाणी वीज पुरवठाही खंडित झाला. तालुक्यातील अनेक गावांमध्ये केळी बागांना मोठा फटका बसल्याचे चित्र आहे.
(ads)
दरम्यान, आमदार अमोल जावळे यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने तात्काळ हालचाल करत आज सकाळी लवकरच शेतकऱ्यांच्या बांधावर भेटी दिल्या. रावेर तालुक्यातील नेहता, दोधा, अटवाडे आदी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यात आली. यावेळी तहसीलदार दिपा जेधे, नायब तहसीलदार संजय तायडे, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके यांच्यासह तलाठी, कृषी सहायक व इतर अधिकारी उपस्थित होते.
(ads)
251 शेतकऱ्यांचे 226 हेक्टरवरील नुकसान
या वादळी पावसाने नेहेते, कुंभारखेडा, सावखेडा,अजनाड, अटवाडे, दोधे, वाघोदा खुर्द, खिर्डी खुर्द, गोलवाडा, भामलवाडी, बलवाडी, शिंगाडी, गाते, चिनावल, ऐनपूर, निंबोल, विटवे, सांगवे, अजंदे, होळ, नंदूरखेडा, भोर, खानापूर वाघोदा बुद्रुक, सिंगत, तांदलवाडी, थोरगव्हाण, चुनवाडे, मांगी, खिरोदा प्र यावल, कळमोदे, कोचूर खुर्द, कोचूर बुद्रुक, बोरखेडेसिम, या 34 गावातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे 194 हेक्टरवरील कापणीला आलेल्या केळी बागांचे तर 30 हेक्टरवरील मका पिकाचे नुकसान झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके यांनी दिली.
(ads)
वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची गंभीर दखल घेत आमदार अमोल जावळे यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हेही वाचा : लहान बालिकेला जंगली प्राण्याने केले ठार : जळगाव जिल्ह्यातली घटना, वन विभागाच्या विरोधात नागरिकांचा संताप
पंचनाम्याचा अहवाल शासनाकडे सादर झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
(ads)
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती रावेरचे सभापती प्रल्हाद पाटील, राजन लासूरकर, तालुका अध्यक्ष सूर्यकांत देशमुख, माजी सरपंच महेंद्र पाटील, धीरज धनके, राजू सवर्ण, लखन महाजन, योगेश महाजन, संजय महाजन, आमदार अमोल जावळे यांचे जनसंपर्क अधिकारी संदीप पाटील, स्वीय सहाय्यक योगेश साळुंखे, जनार्दन पाटील, गणेश धनायते, पवन चौधरी, निलेश सावळे आदी उपस्थित होते.




